मुंबई : शिंदे आणि अजित पवार गट ती भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र आहेत. हे पक्ष अमित शहांनी स्थापन केलेले पक्ष आहेत अजित पवारांचा पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला नाही किंवा एकनाथ शिंदे यांचा गट बाळासाहेबांचा नाही. त्यांचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत, तर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, इथे जर कोणी ऑपरेशन टायगर करायला आलं असेल, तर त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे जे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले. सत्ताधाऱ्यांच्याच गटामध्ये अंतर्गत ऑपरेशनचे काम सुरू असून त्याची सूत्रे दिल्लीतून हलत असल्याचा दावा त्यांनी केला.
विरोधी पक्षनेत्यांची आणि विकास निधीची कोंडी
त्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचा निधी विरोधी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना दिला जात नाही, त्यांची कोंडी केली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना आहेत की विरोधी पक्षाच्या आमदारांची कोणतीही कामे करायची नाहीत, त्यांना एक रुपयाही निधी द्यायचा नाही. ते म्हणाले, जणू यांच्या बापाचा पैसा आहे. धुणी भांडी करून यांच्या बापजाद्यांनी पैसा गोळा केलाय? तिजोरीमध्ये जनतेचा पैसा आहे.
भाजपवर भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आरोप
भाजप केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर क्रॉस व्होटिंग घडवून आणत आहे. ओडिशामध्ये राज्यसभेची निवडणूक झाली, तिथे भाजपने कुणाला निवडून आणलं? दिलीप रे, ज्यांना कोल स्कॅम (कोळसा घोटाळा) मध्ये भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली शिक्षा ठोठावली होती. राऊत पुढे म्हणाले की, ज्यांच्यावर खून, दरोडे, बलात्काराचे आरोप आहेत, अशा लोकांनाच भारतीय जनता पक्ष आपल्या गळाला लावू शकते.
फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
अहिल्यानगरमध्ये एका मुलीवर ॲसिड फेकले गेले, मात्र हे सरकार महिला सुरक्षित असल्याचा खोटा प्रचार करत आहे पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत ते म्हणाले, ङ्गङ्घज्या मुलीवर ॲसिड फेकले ती मुलगी नसून निर्जीव बाहुली होती, अशी उत्तरे तुम्हाला विधानसभेत मिळू शकतात. हे पैशाने आणि भ्रष्टाचाराने आंधळे झाले आहेत.ङ्घङ्घ फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले असून त्यांचा अर्धा वेळ दिल्लीत जातो. तुम्हाला थोडा जरी तुमचा आत्मा जिवंत असेल तर तुम्ही गृहखात्याचा त्याग केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाला ठाकरेंची उपस्थिती
त्यांनी सांगितले की, हेच प्रसाद लाड ज्यांनी शिवसेना भवन जाळून टाकू अशी भाषा केली होती. माझ्यासारखा शिवसैनिक हे विसरू शकत नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. मात्र उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीचे समर्थन करताना ते म्हणाले, शेवटी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे की अशा शुभ प्रसंगी राजकारण आणायचं नसतं, मुलाचं लग्न आहे म्हणून ते गेले असतील.